गर्द सभोवती – मराठी
₹350.00प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक व्यक्ती येतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. काही व्यक्ती मनाच्या खोल खोल कप्प्यात कुठेतरी जाऊन बसतात. बालपणीच्या काही घटना मनात घर करून राहतात. निर्सगाचेही विविध पैलू आपण आपल्या मनात साठवत असतो. अशा अनेक चांगल्या आठवणींची शिदोरी प्रत्येकाकडे असते. आशालता वाबगावकर यांनीही आपल्या जीवनप्रवासातील आठवणींच्या साठवणी लेखमालेच्या स्वरूपात ’दैनिक प्रत्यक्ष’ या बिगर राजकिय वर्तमानपत्रात लिहिल्या व या लेखमाला ’गर्द सभोवती’या पुस्तकात सामाविष्ट करून दि. २६ जून २०१७ रोजी सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
संगीत नाट्यसृष्टीत व चित्रपट क्षेत्रात आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणार्या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून आशालता वाबगावकर या रसिकांना परिचीत आहेतच. आशालता यांचा जन्म मुंबईचा. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’मधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी’ (एसएनडीटी) महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एम.ए.’ केले.
आशालता ह्यांनी विविध भाषांतील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. पुढे ‘चंद्रलेखा , ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून त्यांनी नाटकांचे प्रयोग केले. ‘मत्स्यगंधा’ या संगीत नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली.
अभिनयात सक्रिय असतानाच त्यांनी गायनाची आवडही जोपासली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली आहेत, तसेच कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदामध्येही काही काळ गाणी गायली आहेत.
प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. यात ते म्हणतात, “या लिखाणात मला संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब जाणवत आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून… त्यांचा अंदाज बांधून त्यावर स्वतःचे विचार व्यक्त करणं, हे मला वाटतं आशाताईंमधल्या संवेदनशील माणसाची अन् कलाकाराची ओळख आहे. किती वैविध्यपूर्ण लिखाण त्यांनी या सदरात केलं आहे. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने… वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. बऱ्याचवेळा कलाकार ज्यावेळी स्तंभलेखन करतो वा सदरात लिखाण करतो, त्यावेळी तो त्याच्या कामाविषयी चित्रपट, नाटक वा मालिका यांच्या सहभागाविषयी लिहितो. आशाताईंनी रोजच्या जगण्यातील कितीतरी संदर्भ इतक्या संवेदनशील पद्धतीने या लिखाणात मांडले आहेत की, ते वाचून थक्क व्हायला होतं. हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे. हे लिखाण प्रफुल्लित करणारं आहे.”