इस्रायल एक प्रदीर्घ प्रवास – पण यशस्वी! – मराठी
₹250.00“इस्रायल – एक प्रदीर्घ प्रवास, पण यशस्वी” हे पुस्तक वाचकाला इस्रायल ह्या राष्ट्राच्या विविध पैलूंची सखोल माहिती करून देते. इस्रायलने आज जागतिक रंगमंचावर महत्त्वपूर्ण स्थान पटकावलेले आहे आणि इस्रायल भारताबरोबर आपली आगळीवेगळी मैत्री राखून आहे. ज्याला ज्याला म्हणून ह्या सगळ्याचा विशाल दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, त्याने तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. ह्या पुस्तकाच्या लेखिका ‘शुलमिथ पेणकर-निगरेकर’ ह्या एक भारतीय-इस्रायली महिला असून, सध्या त्यांचे वास्तव्य तेल अवीव्ह येथे आहे.
हे पुस्तक इस्रायलच्या स्फूर्तिदायक इतिहासावर तर प्रकाश टाकतेच; त्याचबरोबर इस्रायलच्या धार्मिक परंपरा, समाजजीवन, चाकोरीबाहेर विचार करत कल्पनेपलीकडच्या गोष्टी साध्य करणारी इस्रायलची नाविन्यपूर्णता, इस्रायलचे सेनादल, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, मुख्य म्हणजे ह्या सगळ्याचा उपयोग करून, आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीतही इस्रायलने केलेली नेत्रदीपक प्रगती ह्या सर्वांशीही वाचकाचा परिचय करून देते. ज्यूधर्मियांचा आद्यपूर्वज अब्राहम आणि ‘होली लँड’संबंधी त्याला झालेला ईश्वराचा दृष्टांत, ह्या ज्यूधर्मामध्ये मान्यता असलेल्या कथेपासून हे पुस्तक सुरू होते. त्यानंतरच्या सर्व कालखंडातील ज्यूधर्मियांच्या इतिहासाचा वेध घेत-घेत ‘झायोनिझम्’च्या उदयाच्या कालखंडाकडे येऊन पोहोचते; व त्यानंतर इस्रायलचे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतरही इस्रायलला लढावी लागलेली महत्त्वाची युद्धे आणि इस्रायलने साधलेली प्रगती ह्यांवर प्रकाश टाकते. ह्या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांनी लिहिलेल्या, ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हा एक परिच्छेद समर्पक ठरावा – “भविष्यकाळात सर्व जगभरात जो युद्धाचा, वैमनस्याचा व मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तींचा भडका उडणार आहे व जो हळूहळू जगभर पसरू शकतो, त्या सर्वांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य, इस्रायल व भारत घट्टपणे एकत्रित राहिल्यास नक्कीच तयार होऊ शकेल; व ह्या दोन देशांच्या हातांना जपान, अमेरिका आणि रशिया ह्यांचे हात येऊन मिळाले, तर होणारा विध्वंस बऱ्याच अंशी टाळता येईल.