गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र – मराठी
₹350.00गुन्हेगारांचे कर्दनकाळ – न्यायवैद्यक शास्त्र– डॉ. वसुधा आपटे
आता अनेक चित्रपट व टि.व्ही. सिरीयल्स मुळे फोरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक शास्त्र) ही संकल्पना अनेकांना परिचीत आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचा फोरेन्सिक रिपोर्ट गुन्हेगाराला पकडून देण्यास व त्याला कोर्टात योग्य ती शिक्षा देण्यास महत्वाची भूमिका बजावतो. न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ. वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्या प्रकरणांमध्ये त्यांनी न्यायालयास मदत केली आहे.
जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत यावे म्हणून ’दैनिक प्रत्यक्ष’ मध्ये त्यांनी या विषयावर लेखमाला लिहीली. या लेखमालेतील लेखांचे इंग्रजीमध्येही भाषांतर केले गेले, व दि. २६ जून २०१७ रोजी निवृत्त पोलिस महासंचालक श्री. प्रवीण दिक्षित यांच्या उपस्थितीत या सर्व लेखांचे मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशन झाले. न्यायवैद्यक शास्त्र ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक आहे.
आपल्या पणजी रमाबाई रानडे यांचा वारसा पुढे नेणार्या डॉ. वसुधा आपटे ह्या सुमारे ३५ वर्ष एवढा प्रदीर्घ अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव महिला न्यायवैद्यकतज्ञ आहेत. आपले एम.बी.बी.एस. पूर्ण झाल्यावर ह्यांनी लग्नानंतर एम.डी. व एल.एल.बी. ची पदवी मिळवली. डॉ. वसुधा आपटे या नायर हॉस्पीटल व सूरत येतील ’इस्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅंड रिसर्च’ येथे ’फोरेन्सिक मेडिसीन आणि टॉक्सिकॉलॉजी’ विभागाच्या प्रमुख तसेच नायरसंलग्न टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.
या पुस्तकाची प्रस्तावना निवृत्त पोलिस महासंचालक श्री. प्रवीण दिक्षित यांनी लिहीली आहे. यात ते लिहितात, “जरी हे पुस्तक डॉ. वसुधा आपटे यांनी सर्वसामान्यांसाठी लिहिलेले असले तरी तपासासाठी अत्यंत उपयोगी असल्याने ते सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या तपासातील त्रुटी कमी करण्यासाठी’कोश’ म्हणून वापरावे इतके उत्कृष्ट आहे. ह्या पुस्तकामध्ये जवळ जवळ १३० विविध विषयांचा ऊहापोह, सर्व शास्त्रीय माहिती देऊन, ती अतिशय रोचक पध्दतीने वाचकांसमोर आणलेली आहे. न्यायवैद्यक शास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा त्या गुन्ह्याशी संबंध सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीस शिक्षा होते, तेव्हा ती निर्विवाद असते. गुन्ह्याचा तपास हा शास्त्रोक्त पद्धतीने करायचा असल्यास, ते फक्त न्यायवैद्यक शास्त्राचा अभ्यास करण्यानेच शक्य आहे. ज्या गुन्ह्यात कोणीही माहिती देत नाही व बर्याच वेळेला पीडित व्यक्ती मृत असते आणि जर हे गुन्हे विशेषतः कुटुंबांतर्गत असतील तर ते फक्त न्यायवैद्यक शास्त्रामुळेच उघडकीस येऊ शकतात.”
हे पुस्तक प्रकाशीत झाल्यापासून आतापर्यंत संबंधित कायद्यांमध्ये बदल झाले आहेत, संशोधनामुळे नविन माहिती उपलब्ध झाली आहे. निदानतंत्र व उपाचारातही बदल झाले आहेत, तरीही न्यायवैद्यक शास्त्र या विषयाबद्द्ल समाजात असलेले अनेक समज – गैरसमज यावर हे पुस्तक प्रकाश टाकेल व अनेकांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते.