राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – मराठी
₹275.00‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ १९२५ साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी रोवलेल्या या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. बालपणापासून संघाशी जोडले गेलेले आणि सारे जीवन संघाला वाहिलेले ‘रमेशभाई मेहता’ यांनी संघाचा इतिहास दैनिक प्रत्यक्ष मध्ये लेखमालेच्या स्वरुपात आपल्यासमोर मांडला. संघासाठी आणि संघाच्या मार्फत समाजासाठी, संस्कृतीसाठी, मातृधर्माच्या अभ्युदयासाठी प्रयत्न करणारे रमेशभाई म्हणजे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच नाही, तर स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा ‘चालता बोलता इतिहास’च आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात संपन्न कुटुंबात जन्म झालेल्या रमेशभाईनी बालपणी संघाच्या शाखेत पाऊल ठेवले; आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल संघाच्या निर्देशानेच पडत राहिले आणि आजही त्यांची ही वाटचाल सुरू आहे.
अनेक राजकीय पक्ष हे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विचारसरणीला विरोध करत आलेले आहेत. इंग्रजांच्या राजवटीत तसेच १९४८ साली, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) आणि १९९२ साली अयोध्या प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही काळ बंदीही घालण्यात आली होती. जनसामान्य मात्र संघाबाबतच्या दोन मतप्रवाहामुळे चकित होत असतात. एकीकडे संघाशी जोडला गेलेला विशाल जनसमुदाय, तर दुसरीकडे संघावर तुटून पडणारी, संघाच्या विचारधारेवर जहाल टीका करणारी मंडळी, असे चित्र सर्वसामान्य भारतीय गेली अनेक दशके पाहत आहे. म्हणूनच संघाचे विचार, संघाने दिलेल्या योगदानाची माहिती आणि ह्याचे महत्त्व तटस्थपणे समजून घेणे अधिक श्रेयस्कर ठरेल. कुणाचे विचार स्वीकारायचे किंवा नाकारायचे, याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असतेच. पण विचार स्वीकारण्याच्या अथवा नाकारण्याच्या आधी, ते विचार नीट समजून घेण्याची प्रक्रिया प्रगल्भ मंडळी कधीही टाळत नाहीत आणि ‘संवाद’हा या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतला हाच संवाद म्हणजे ‘दैनिक प्रत्यक्ष’ची मध्ये आलेली लेखमाला – ‘चालता बोलता इतिहास’!
या मराठी लेखमालेचे हिंदी. इंग्रजी व गुजराती भाषांमध्येही भाषांतर झाले व ते पुस्तक रूपाने प्रसिध्दही झाले. या चारही भांषेंमधील पुस्तकांचा अनावरण सोहळा उत्तर प्रदेश चे माननीय राज्यपाल श्री. राम नाईक, केंद्रीय वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, राज्यसभा सदस्य व एस्सेल ग्रुप उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुभाष चंद्रा यांच्या हस्ते दि. २९ एप्रिल २०१७ रोजी पार पडला.
रमेशभाई मेहता यांनी सर्वसामान्यास अपरिचीत असणार्या आपल्या देशाचा इतिहासाबरोबरच १९२५ पासून १९९६ पर्यंतचा संघाचा प्रवास या पुस्तकात मांडलेला आहे. डॉ. हेगडेवारांनी संघाची स्थापना केल्यापासूनची वाटचाल, त्यामागची प्रेरणा, द्वितीय सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंतची माहिती या पुस्तकात सामाविष्ट करण्यात आली आहे. तसेच विविध समाज घटकांना (उदा. महिला, विद्यार्थी, वनवासी, कामगार इ.) एकत्र बांधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक संघटनांची स्थापना केली याचीही माहिती या पुस्तकात मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल समाजात असलेले अनेक समज – गैरसमज यावर हे पुस्तक प्रकाश टाकेल अशी आशा वाटते.